फोटो स्रोत, AFP
जेन्सन हुआंग हे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI क्षेत्रातील एनव्हीडिया या सर्वात मोठ्या कंपनीचे सीईओ. त्यांच्याशी संबंधित प्रकरणानं चीन आणि अमेरिकेसह जगभरात अक्षरश: खळबळ उडवलीय.
हुआंग यांचा एका संशयित चिनी महिला गुप्तहेराशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी चौकशी सुरू झाली आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या एका वृत्तानुसार, चीनमधील बिझनेसवुमन असलेल्या ॲलिस हुआंग या चीनसाठी हेरगिरी करत होत्या, असं अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांचं मत होतं.
अधिकाऱ्यांचं असंही मत आहे की, ॲलिस यांचे एनव्हीडियाचे सीईओ आणि सह-संस्थापक जेन्सन हुआंग यांच्याशी जवळचे संबंध होते.
हुआंग यांनी पत्नीचा विश्वासघात केल्याचं रविवारी कबूलही केलं आणि आपल्या मुलांना दिलेल्या त्रासाबद्दल माफी मागितली आहे.
एनव्हीडियानं या सगळ्या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे.
तसंच, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला कोणताही धोका पोहोचला आहे, असं आपल्याला वाटत नाही, असं कंपनीनं म्हटलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितलं की, एफबीआयदेखील या प्रकरणाचा तपास करत आहे.
End of सर्वाधिक वाचलेले
बीबीसीनं संपर्क साधला असता, एफबीआयनं यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.
ट्रम्प यांनी सांगितलं की, त्यांनी सोमवारी हुआंग यांच्याशी चर्चा केली होती.
चीननं हेरगिरी मोहिमेचा भाग म्हणून हुआंग यांना लक्ष्य केलं असावं, असा संशय अमेरिकेला असल्याचं वृत्तही आधी समोर आलं होतं.
यासंदर्भात ट्रम्प यांनी पत्रकारांना माहिती देताना म्हटलं की, "मी त्यांना विचारलं की, 'ती एक गुप्तहेर होती हे तुम्हाला माहीत होतं का?' ते म्हणाले की, 'ती एक गुप्तहेर आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती.' आणि माझा त्याच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास आहे," असंही ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितलं.
या प्रकरणात आतापर्यंत काय काय उघडकीस आलं आहे आणि ते महत्त्वाचे का आहे, हे आपण पाहूयात.
ॲलिस हुआंग कोण आहे?
तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर
फॉलो करा
End of podcast promotion
न्यूयॉर्क टाइम्सच्या एका वृत्तानुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांना असं वाटतं होतं की, चीनच्या सर्वोच्च गुप्तचर संस्थेनं ॲलिस हुआंग यांना हेरगिरीसाठी भरती केलं होतं. त्या सध्या कुठे आहेत, याबाबत मात्र काहीही माहिती उपलब्ध नाही.
ॲलिस हुआंग यांचे जेन्सेन हुआंग यांच्याशी कोणत्याही प्रकारचे कौटुंबिक संबंध नाहीयेत.
त्यांनी मार्च ते नोव्हेंबर 2023 दरम्यान सिंगापूरमधील डेटा सेंटर कंपनी असलेल्या 'मेगास्पीड'मध्ये एका वरिष्ठ पदावर काम केलं होतं.
या कंपनीवर एनव्हीडियाच्या चिप्स चीनला पाठवण्यासाठी मदत केल्याचा संशय होता. मात्र, एनव्हीडियाच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि हे आरोप खोटे असल्याचं सिद्ध झालं.
सिंगापूर सरकार 'मेगास्पीड' विरुद्धच्या आधीच्या आरोपांची चौकशी करत आहे. या आरोपांनुसार, ही कंपनी उच्च-क्षमतेच्या 'एनव्हीडिया' चिप्सच्या निर्यातीवर अमेरिकेनं घातलेल्या निर्बंधांमधून पळवाट शोधण्याचा प्रयत्न करत होती. बीबीसीने या प्रकरणावर भाष्य करण्यासाठी 'मेगास्पीड'शी संपर्क साधला आहे.
कंपनीने गेल्या महिन्यात न्यूयॉर्क टाइम्सला सांगितलं की, त्यांच्या सध्याच्या नेतृत्वानं हे आरोप गांभीर्याने घेतले असून अंतर्गत चौकशी करण्यासाठी बाह्य कायदेशीर सल्लागाराची देखील नियुक्ती केली आहे.
फोटो स्रोत, Getty Images
वृत्तानुसार, पाळत ठेवल्यामुळे ॲलिस हुआंग आणि एका अमेरिकन नागरिकामधील संभाषण उघडकीस आलं. नंतर 'अनमास्किंग' नावाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून त्या अमेरिकन नागरिकाची ओळख जेन्सेन हुआंग असल्याचं स्पष्ट झालं.
मात्र, हुआंग ले या नावाने देखील ओळखल्या जाणाऱ्या ॲलिस हुआंग यांनी नेमकी कोणती गुप्त माहिती गोळा करून बीजिंगला दिली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तिनं वृत्तपत्रांच्याही प्रश्नांना प्रतिसाद दिला नाही.
जेव्हा बीबीसीनं एनव्हीडियाला विचारलं की, अमेरिकन गुप्तचर अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या चिंतांची कंपनीला माहिती आहे का, तेव्हा कंपनीनं ती माहिती नसल्याचं सांगितलं.
एनव्हीडियाच्या एका प्रवक्त्यानं बीबीसीला सांगितलं की, "आम्हाला खात्री आहे की, जर आम्हाला खरोखरचा एखादा मोठा धोका असता, तर अमेरिकन सरकारनं आम्हाला कळवलं असतं."
चीनने हेरगिरीचे हे आरोप फेटाळून लावले आहेत.
"आम्ही यावर आधीच उत्तर दिलं आहे. चिनी गुप्तहेरांबद्दलचे हे आरोप पूर्णपणे निराधार, केवळ अटकळींवर आधारित आणि चीनला बदनाम करण्याच्या उद्देशानं करण्यात आलेले आहेत," असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी सोमवारी एका नियमित पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितलं.
ऑक्टोबरच्या उत्तरार्धात 'द न्यूयॉर्क टाइम्स'नं वृत्त दिलं होतं की, गेल्या वर्षी ट्रम्प यांना अशी गुप्तचर माहिती देण्यात आली होती, ज्यामध्ये ॲलिस हुआंग चीनसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप होता.
रविवारी पत्रकारांनी ट्रम्प यांना विचारलं की गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या प्रकरणी कारवाई करायला हवी होती का?
त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, "नाही, मला तसं वाटत नाही. माझ्या मते ते एक सन्माननीय व्यक्ती आहेत."
दरम्यान, हुआंग यांच्याविषयी विचारलं असता अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी त्यावर भाष्य करण्यास नकार दिला.
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, गेल्या वसंत ऋतूमध्ये, रुबियो यांनी एका मेमोचा मसुदा तयार करण्याचं काम पाहिलं होतं. त्यामध्ये हुआंग यांच्या एका चिनी बिझनेसवूमनसोबतच्या संबंधांबद्दल ट्रम्प प्रशासनाला इशारा देण्यात आला होता.
हा विषय महत्त्वाचा का आहे?
अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांच्या 'एआय'च्या शर्यतीच्या केंद्रस्थानी एनव्हिडिया ही कंपनी आहे. म्हणूनच या कंपनीच्या अब्जाधीश असलेल्या प्रमुखाच्या वैयक्तिक संबंधांशी निगडीत आरोपांमुळे अमेरिकन खासदारांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात चिंता निर्माण झाली आहे.
ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, "जो कुणी एआयची शर्यत जिंकेल, तोच जिंकेल." चिंता ही आहे की, जर चीननं एआयमध्ये अमेरिकेला मागे टाकलं, तर तो आपल्या लष्करी आणि निगराणी क्षमतांचा वेगानं विस्तार करू शकतो.
एआयच्या क्षेत्रामध्ये अमेरिकेनं घेतलेल्या आघाडीमागचं एक प्रमुख कारण म्हणजे एनव्हिडियासारख्या अमेरिकन कंपन्या होय.
त्या तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (TSMC) सारख्या उत्पादकांसोबत काम करतात. 'टीएसएमसी' जगातील 90 टक्क्यांहून अधिक सर्वात प्रगत चिप्सचं उत्पादन करते.
फोटो स्रोत, JIM WATSON/AFP via Getty Images
2022 पासून, अमेरिकेनं सर्वात प्रगत तंत्रज्ञान चीनपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी अनेक निर्यात निर्बंध लागू केले आहेत. कारण, त्यांच्या मते या उपायांमुळे त्यांची स्पर्धात्मक आघाडी टिकून राहते आणि राष्ट्रीय सुरक्षेचं रक्षण होतं.
या निर्बंधांमुळे जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या चीनमध्ये एनव्हीडियासारख्या कंपन्यांना व्यवसाय करणं अधिकाधिक कठीण झालं आहे.
हुआंग एकदा म्हणाले होते की, चीनमधील एनव्हीडियाचा बाजारहिस्सा सुमारे 95 टक्क्यांवरून जवळजवळ शून्यावर घसरला आहे.
हुआंग हे अमेरिका आणि चीन यांच्यात संवाद आणि संपर्क कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत.
अमेरिकन सरकारकडून चिनी बाजारपेठेत पुन्हा प्रवेश करण्यासाठी मंजुरी मिळवणं आणि त्या प्रक्रियेद्वारे अमेरिकेच्या धोरणांवर प्रभाव पाडणं हा त्यांचा हेतू आहे.
रविवारी समोर आलेल्या गोष्टींवरून कदाचित हे स्पष्ट होऊ शकेल की, एनव्हीडियासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकणारी गोष्ट साध्य करण्यात हुआंग आतापर्यंत का अपयशी ठरले आहेत.
ती गोष्ट म्हणजेच, सर्वात प्रगत चिप्स वगळता, इतर सर्व चिप्स चीनला विकण्यासाठी ट्रम्प प्रशासनाकडून मंजुरी मिळवणं होय.
जेन्सन हुआंग कोण आहेत?
जेन्सन हुआंग यांचा जन्म 1963 मध्ये तैवानमध्ये झाला. ते नऊ वर्षांचे असताना, त्यांचं कुटुंब अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर स्थलांतरित झालं.
त्यांनी ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतले आणि त्यानंतर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून त्याच विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली.
हुआंग यांनी अमेरिकन चिप कंपनी एएमडीमध्ये काम केलं आणि नंतर एनव्हीडियामध्ये सह-संस्थापक झाले. तैवानमध्ये त्यांना "डॅडी हुआंग" म्हणून ओळखलं जातं. एकेकाळी त्यांना तंत्रज्ञान जगतामधील "टेलर स्विफ्ट" असंही म्हटलं गेलं आहे.
आपल्या कामाप्रती अत्यंत समर्पित आणि आपल्या कर्मचाऱ्यांकडून खूप उच्च प्रतीच्या अपेक्षा असणारा व्यक्ती अशी हुआंग यांची ओळख आहे.
फोटो स्रोत, Bloomberg via Getty Images
ब्लूमबर्ग बिलिनीयर्स इंडेक्सनुसार, त्यांची अंदाजे संपत्ती 155 अब्ज डॉलर्स आहे.
"स्टीव्ह जॉब्स यांच्याप्रमाणे जेन्सन हुआंग हे तंत्रज्ञान जगतातील एक दूरदृष्टी असलेले व्यक्ती आहेत," असं हुआंग यांच्या 'थिंकिंग मशीन्स' या चरित्राचे लेखक स्टीफन विट यांनी बीबीसीला सांगितलं.
ते म्हणाले की, आज एआयमध्ये वापरल्या जाणाऱ्या हार्डवेअरच्या विकासात हुआंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
हुआंग आणि ट्रम्प यांचे संबंध जवळचे राहिलेले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये नुकत्याच झालेल्या एका एआय परिषदेला 42 टेक कंपन्यांचे कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. ट्रम्प यांच्यासोबत इलॉन मस्क आणि हुआंग होते.
चौकशीसंदर्भातील बातमी समोर आल्यापासून आपण एनव्हीडियाच्या प्रमुखांशी बोललेलो नाही, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, "मला एवढंच माहीत आहे की तो एक चांगला माणूस आहे, पण पडद्यामागे नक्की काय चाललं आहे, हे तुम्हाला कधीच सांगता येत नाही." त्यांनी असंही म्हटलं की, हुआंगने "आपल्या देशासाठी अतिशय उत्तम काम केलं आहे."
एनव्हीडिया काय आहे आणि ही कंपनी किती महत्त्वाची आहे?
जेन्सेन हुआंग यांनी, इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स ख्रिस मालाचोवस्की आणि कर्टिस प्रियम यांच्यासोबत 1993 मध्ये एनव्हीडियाची स्थापना केली होती.
सुरुवातीला ही कंपनी ग्राफिक्स प्रोसेसिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या चिप्सचं उत्पादन करत असे. विशेषतः, ज्यांची गरज कॉम्प्युटर गेम्समध्ये लागत असे.
नंतर कंपनीनं आपले लक्ष एआयकडे वळवलं. हे एक असं क्षेत्र आहे ज्यावर आता एनव्हीडियाचं वर्चस्व आहे.
हुआंग यांनी एनव्हीडियाला अनेक वेळा दिवाळखोरीतून वाचवलं आहे. जगाला एआयचं महत्त्व कळण्यापूर्वीच त्यांनी त्यात गुंतवणूक केली आणि अगदी सुरुवातीपासूनच आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात भूमिका बजावली.
"आज जेव्हा आपण एआयचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर प्रचंड मोठे डेटा सेंटर्स येतात. त्या काळी, यापैकी काहीही अस्तित्वात नव्हतं. हुआंग जे काही तयार करत होते, त्यासाठी कुणी ग्राहक नव्हतं. खरं तर, त्यांचा पहिला ग्राहक ओपनएआय होता, जेव्हा तिथं फक्त 30 लोक काम करत होते. त्यांनी हे तंत्रज्ञान त्यांना दिलं होतं. त्यांनी ते एकप्रकारे दान केलं," असं स्टीफन विट यांनी बीबीसीला सांगितलं.
आज, ॲमेझॉन, मेटा, गुगल आणि मायक्रोसॉफ्टसह, एआय टूल्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणाऱ्या जवळपास सर्व प्रमुख तंत्रज्ञान कंपन्या या एनव्हीडियाच्याच चिप्स वापरतात.
एनव्हीडियाचं सध्याचं बाजार भांडवल 4.5 ट्रिलियन डॉलर्स असून, त्यामुळे ती जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाचा सध्या तरी हुआंग यांना त्यांच्या पदावरून हटवण्याचा कोणताही इरादा दिसत नाही. रविवारी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात, संचालक मंडळानं म्हटलं आहे की, "आमचा जेन्सेन आणि त्यांच्या टीमवर विश्वास आहे."
सूत्रांनी बीबीसीला सांगितलं की, हुआंग यांना त्यांच्या पदावरून हटवलं जाण्याची शक्यता कमी आहे. कारण, कंपनीमध्ये त्यांचे मोठे आर्थिक हितसंबंध आहेत.
63 वर्षीय हुआंग यांचा उत्तराधिकारी कोण असेल, याबाबत कोणतंही नियोजन अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.
त्यांनी अनेक प्रसंगी असं म्हटलं आहे की, पुढील अनेक दशकं या पदावर कायम राहण्याची त्यांची इच्छा आहे.
ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, त्यांनी स्वतःभोवती नेतृत्वाची एक अनौपचारिक रचना तयार केली आहे, जी पारंपरिक कंपन्यांच्या पद्धतीपेक्षा वेगळी आहे.
त्यांची मुले स्पेन्सर आणि मॅडिसन आणि जावई निको कॅप्रेझ हे देखील एनव्हिडियामध्ये वरिष्ठ पदांवर आहेत.
जेन्सन हुआंग यांची पत्नी कोण आहे?
1980 च्या दशकाच्या सुरुवातीला हुआंग यांची त्यांच्या होणाऱ्या पत्नी लॉरी मिल्स यांच्याशी ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये भेट झाली.
त्यावेळी ते दोघेही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होते आणि एकाच लॅबमध्ये काम करत होते.
त्या दोघांनी 1985 मध्ये लग्न केलं. म्हणजेच, एनव्हिडियाची सह-स्थापना करण्याच्या सुमारे आठ वर्षे आधी हे लग्न झालं. त्यांना मॅडिसन आणि स्पेन्सर ही दोन मुलं आहेत.
2007 मध्ये, त्या दोघांनी जेएच अँड एल हुआंग फाउंडेशनची स्थापना केली.
एनव्हीडियाच्या शेअरच्या किमतीत झालेल्या जलद वाढीमुळे, गेल्या काही वर्षांत फाउंडेशनच्या मालमत्तेत लक्षणीय वाढ झाली आहे.
तिचं मूल्य 9 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.
फाउंडेशननं ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटी आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना लाखो डॉलर्सची देणगी दिली आहे.
हुआंग यांचे चरित्रकार स्टीफन विट यांनी बीबीसीला सांगितलं की, हुआंग यांनी स्वतःला एक कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणून सादर करण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. ते म्हणाले की, "हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे."
ते पुढे म्हणाले की, "ते आपल्या पत्नीची प्रशंसा करतात आणि त्यांच्याबद्दल खूप चांगल्या गोष्टी बोलतात. अशा गोष्टी उघडकीस आल्यास कोणत्याही कुटुंबावर वाईट असा परिणाम होऊ शकतो. पण ज्या माणसानं स्वतःला एक कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणून दाखवण्यासाठी आणि आपल्या मुलांना जवळ ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत, त्याच्यासाठी हा परिणाम आणखी गंभीर असू शकतो."
लंडनमधून टॉम मॅकआर्थर, सिंगापूरमधून आयेशिया परेरा आणि टेसा वाँग, तसेच सिडनीमधून हेलन डेव्हिडसन यांनी अतिरिक्त वृत्तांकन केलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
अधिक शोधा
शॉर्ट व्हीडिओ
शॉर्ट व्हीडिओचा शेवट




